आयुष्य साधं, सरळ, सुलभ आणि सोपं क्वचितच असतं! साधारण माणसाच्या आयुष्यात अडचणी आणि तणावच अधिक! अशा वेळी आपण देवाला हात जोडतो. आणि देव कोणा ना कोणा रुपांत उभा राहतोच! वसईच्या असंख्य मुलांच्या आयुष्यात परुळेकर सरांच्या रुपात देव उभा राहिला!
सरांनी किती विद्यार्थी विद्यार्थिनींचं आयुष्य घडवलं, मार्गाला लावलं, त्याला तोंड नाही! त्यात माणिकपुरचा तशा अशिक्षितच घरातला ख्रिस्ती मुलगा असो; गोव्याहून नवीनच लग्न होऊन आलेली एसएससीच्या इंग्रजीला भिणारी बुजरी वहिनी असो; कष्ट करून कमावत घर उभा करणारा पापडीचा धडपड्या, जिद्दी पोर असो; पंचवीस वर्षं शिकवून काढल्यावरही सरकारच्या अॅार्डर ने बीएड केलेच पाहिजे म्हटल्यावर गडबडलेल्या ताई असोत! असंख्य मुलांना मदतीचा हात, हिंमत आणि हुरूप दिला तो सरांनी! चाळीसावर वर्षं पुजलेला हा विद्यार्थी घडवण्याचा यज्ञ होता!
ह्या यज्ञातली बहुदा पहिली, १९५३ च्या बॅच ची मुलगी सुशीला! सुशीला ला सरांत देव दिसला, तिची ही गोष्ट. कुंदाताई वालावलकर यांच्याकडून ऐकलेली!
कुंदाताई वालावलकर, आता पंचाऐशीच्यावर वय, ताठ कणा, वाणी सुस्पष्ट ह्या परुळेकर सरांच्या सत्तरावर अधिक वर्षांपूर्वीच्या विद्यार्थिनी! सर तेव्हा नुकतेच विल्सनमधून डिग्री घेऊन नव्याने सुरू झालेल्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिकवत. पडेल तो विषय! पण मुख्य पोटतिडीक- मुलांनी शिकावं ही! कुंदाताई सुशीला नावाच्या मॅट्रिकच्या वर्षाच्या मुलीची गोष्ट अगदी रंगवून सांगतात. नाईकांचं घर पारनाक्यावरून शनीमंदिराकडे जाताना उजवीकडे होतं! सुशीला अभ्यासात हुषार, पण वडील जमदग्नी! वडीलांचं म्हणणं – शिक्षण पुरे! आता घरात लक्ष ध्या! लग्न करून वेळेत आप-आपल्या धरी जा! मॅट्रिकच्या परीक्षेचा फॅार्म भरायचे दिवस आणि वडीलांनी सुशीलाचं नाव शाळेतनं काढून टाकलं! सारे शिक्षक चमकलेच! पण ‘जमदग्नी‘ ला सांगणार कोण? कोण त्या बापाला सांगू शकेल? सारेच शिक्षक अननुभवी! सर्वानुमते परुळेकर सरांवर ही जबाबदारी देण्यात तर आली! शिकवतानाही मुलींकडे आपलं तोंडही न करता बोलणारे सर, शाळा सुटल्यावर सुशीलाच्या धरी गेले; मुलीला शिकवणं, मॅट्रिकच्या परीक्षेला बसवणं, सक्षम बनवणं कसं महत्वाचं आहे, सुशीलाचा अभ्यास कसा उत्तम आहे.. सारं वडीलांना सांगीतलं! दरवाजाआडून सारं ऐकणाऱ्या सुशीलेचे डोळे भरून आले! शिकवताना कुणाही मुलीकडे नजर उचलून न पहाता फक्त हात करीत “You there! Tell me the answer!” असं विचारत, कोणताही विषय उत्तम शिकवणाऱ्या ह्या सरांना मुलींच्या शिक्षणाची एवढी तळमळ असेल, असं तिच्या स्वप्नातही आलं नव्हता! त्या तरुण शिक्षकाची compassion, पोटतिडीक, निःस्वार्थी urge त्या बापाला पटली असावी; कारण दुसऱ्या दिवसापासून सुशीला शाळेत यायला लागली, फॅार्म भरला, घरचं सांभाळून परीक्षेला बसली! आणि कुंदाताईंनी सांगितल्या प्रमाणे ही सुशीला न्यू इंग्लिश स्कूल मधून मॅट्रिक पास होणारी पहिली मुलगी ठरली! आपल्या करारी, रागीट अशा वडिलांशी न घाबरतां बोलणारा हा तरुण शिक्षक सुशीलेला देवच वाटला!
अशा असंख्य सुशीलांना सरांमध्ये देव मिळाला. अनेकांची आयुष्य सरांच्या मार्गदर्शनाने, प्रयत्नानी आणि आशीर्वादांनी घडली! – मी त्यातला एक!
सुशीलाची गोष्ट-‘मला देव दिसला’
शब्दांकन- सद् गुरु कुळकर्णी