आदरणीय सर,
आपले मार्गदर्शन, आपली शिकवण अजूनही मला प्रेरणादायी आहे. तुमच्यामुळेच मी योग्य मार्गावर वाटचाल करू शकत आलो आहे. आपणाकडून मिळालेले ज्ञान आणि संस्कार नेहमीच माझ्यासोबत राहतील. जीवनाच्या प्रत्येक समस्येत जर कोणी मार्ग दाखवला असेल तर ते आपण आहात सर! आपण माझ्या आयुष्यात गुरु म्हणून आल्याने मी धन्य झालो. शिकवता शिकवता आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य आपण मला मिळवून दिलात . ज्या ज्या वेळी आपली शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडली ती ती वेळ मी अजूनही विसरलो नाही.
आपण मला अक्षर अक्षर शिकवलात, शब्द शब्दांचा अर्थ उलगडून सांगितलात, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तयार केलात. आपण ज्ञानाचा आणि संस्कारांचा महासागर होतात. एका शेतकऱ्याप्रमाणे माझ्या मेंदूत ज्ञानाचे आणि संस्काराचे बीज आपण पेरून गेलात. त्याचच फळ म्हणून आपला संस्कार वर्ग आपण 1991 थांबविल्यानंतर 2025 पर्यंत पुढे 34 वर्षे मी गुरुकृपा विद्यानिकेतनाचे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करू शकलो. आपणामुळेच माझ्यासारख्या दगडाचा मोती बनू शकला. धर्म, जात, रंग, रूप हा भेदभाव न करता आपण केलेले ज्ञान आजही आम्हा सर्व गुरुबंधू गुरु भगिनींना मनापासून आठवते. एक मित्र, एक मार्गदर्शक, वेळप्रसंगी माझा जवळचा नातेवाईक म्हणून आपण माझ्या जीवनात अवतरलात. ज्ञानाचा हात डोक्यावर ठेवलात, संस्कारांचे बीज मेंदूत रुजवलात, त्याबद्दल मी आपला आजन्म कृतज्ञ आहे. सामान्य शिक्षकांनी फक्त मला सांगितले, वरिष्ठ शिक्षकांनी स्पष्टीकरण दिले, पण आपण मला प्रेरित केलात. ज्ञानाशी मला जोडणारा सेतू आपण होतात. सर माझे जग संपूर्ण बदलण्यासाठी खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद.
मला वाटते मी तुमचा शतजन्म आभारी राहीन हे सांगण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे, कारण आज आपला 105 वा अवतार दिन आहे. मला एक जबाबदार व्यक्ती बनवण्याबद्दल मी आपला ऋणी आहे. उद्याची आव्हाने पेलताना आपल्या शेवटचा श्वासापर्यंत आपण माझ्याबरोबर राहिलात हे माझे मी नशीब समजतो. आपण मला हिऱ्याप्रमाणे सजवण्यासाठी आपल्या पहिल्या भेटीतच मला विद्यार्थ्यांना शिकवण्याची गळ घातली. त्यामुळे मी माझ्या एसएससी पासून आजमितिपर्यंत ज्ञानदान करत आलो. स्टेट बँकेसारख्या अग्रगण्य बँकेत मजबूत पगार मिळत असूनही मी सर्व व्यसनांपासून दूर राहू शकलो ही सर्व आपली माझ्या बाबतीतली भविष्याची विचारसरणी माझ्या आयुष्याला फुलून गेली. माझ्या शिकवणी वर्गाला विद्यानिकेतन हे आपण सुचवलेले शीर्षक आपला माझ्यावरचा विश्वास आणि आपुलकी दाखवून गेला. माझ्या गुरुकृपा विद्यानिकेतनाच्या सर्व कार्यक्रमांना आपली उपस्थिती हाच मला मिळालेला आशीर्वाद होता. गुरुकृपा विद्यानिकेतनाच्या वास्तूमध्ये आपली वेळोवेळची उपस्थिती मला नेहमीच उपकारक ठरली.आज पर्यंत समाजात माझी जी काही प्रतिमा उभी आहे त्याचं सर्व श्रेय सर आपणाला आहे. आज आपणास आपल्या जन्मदिनासाठी मी पामर, मनापासून शुभेच्छा अर्पण करतो.
आपला वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सोनपिवळ्या उन्हा मधल्या रिमझिमणाऱ्या श्रावण धारा.
एकूणच आपण मला केलेल्या मार्गदर्शनामध्ये मला शिवनेरीची श्रीमंती, पुरंदरची भव्यता, सिंहगडाची शौर्यता, सह्याद्रीची उंची आढळली.
माझ्यासारख्या इतर गुरुबंधू भगिनींसाठी तितकेच परिश्रम घेऊन त्यांच्या जीवनाची नौका पैलतिराला सुखरूप नेताना आपण नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहिलात. आपल्या शिकवणीतून आणि संस्कारातून थोडफार स्वीकारल्याने आज माझे जीवन वयाच्या 72 व्या वर्षी सुद्धा मला आनंद देऊन जात आहे.
सर आपणास शतशत नमस्कार.
पुन्हा एकदा आपल्या जन्मदिना बद्दल शुभेच्छा व्यक्त करताना मी आपला ऋणी राहत आहे.