Parulekar Sir Foundation

पूर्णत्वाचा घ्यास

कोणत्याही कामात पूर्णत्वाचा ध्यास घेणं हे परुळेकर सरांचं वैशिष्ठ्य होतं. मग ते काम कितीही साधं असो. अशा पूर्णत्वासाठी, perfection साठी ते कायम सजग असायचे; स्वतः परफेक्ट असतंच, पण इतरांकडूनही ते परफेक्शनची मागणी करायचे! 
 
सरांचं किंचित उजवीकडून डावीकडे झुकलेलं नेटकं अक्षर कित्येक जणांना आठवत असेल. फळ्यावर उत्तरं लिहायला ते ज्याला किंवा जिला सांगत, त्याचं किंवा तिचं अक्षर मोत्याच्या दाण्यागत असे! हस्ताक्षरातला नीटनेटकेपणा त्यांना प्रसन्न करायचा. माझा एक वसईकर विद्यार्थी अतिशय देखण्या हस्ताक्षरात, उत्तरात व्याकरणाच्या अक्षम्य चुका करायचा आणि त्या सुंदर हस्ताक्षराच्या प्रभावाखाली त्या चुका कशा बेमालूम खपून जायच्या, हा विनोदाचा भाग म्हणून आठवतो!
 
उत्तरपत्रिका बनवायला सरांकडे जुन्या उत्तरपत्रिकांमधून न वापरलेल्या कोऱ्या पानांचा गठ्ठा जमा केलेला असायचा. त्यातून नेमकी, एका आकाराची आठ नाहीतर बारा पानं काढून, ती नेमकी शिवून नवीन उत्तरपत्रिका बनवून सरांनी तयार ठेवलेली असे. हातात पडल्यावर सोडवायला हुरूप येई. अशा पानांवर डावीकडे बरोबर एक इंच सोडून समास हलक्या हातांनी आखायचा; उजवीकडे पाव इंचापेक्षा जरा कमी समास आखण्याची पद्धत सरांकडेच शिकलो. उत्तर लिहितांना अक्षर नीट ओळीवर यावीत, अक्षरांतलं, दोन शब्दांतलं अंतर सुयोग्य तेवढं आणि तेवढंच यावं असा सरांचा आग्रह असे. कधी मराठी लेखनात मध्येच इंग्रजी शब्द आला तर ओळीच्या वर गिचमिड न करता कसा लिहावा हे सरांकडूनच शिकावं! अक्षर नीट यावं आणि पाठांतरही नीट व्हावं यासाठी सर तेव्हा मुलांना मे शाळेच्या मे महिन्याच्या सुट्टीत महत्वाचे धडे लिहून काढायला सांगत असत. बाजूला बसलेल्या मुलांना लेखन नीट पूर्ण झालं की नाही हे तपासायची जबाबदारी असे. ‘सरांना लेखनाची वही पूर्ण पाहिजे’ ह्या प्रेशरखाली काही आळशी मुलं क्लास सुरू असतानाच खाली मान घालून वहीत पटापट धडे लिहीत असत ज्यामुळे अक्षर आहे त्याहून अधिक वाईट होई; किंवा एकमेकाला मदत करून ‘कंप्लिट झालं, सर’ असंही सांगत. मी क्लासमध्ये उशीरा म्हणजे अॅागस्ट महिन्यात गेलो, त्यामुळे माझ्यावर ‘वही लिहिण्याचं काम’ कधी आलं नाही! सरांच्या ह्या हस्ताक्षर प्रेमासाठी आपण त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हस्ताक्षर स्पर्धा सुरू केली आहे. त्यात बक्षिस मिळवणाऱ्या मुलामुलींची मोत्यासारखी अक्षरं पाहून सर किती प्रसन्न झाले असते नाही?
 
आमच्या एस एस सीच्या वर्षी सरांनी मराठीच्या पन्नास एक प्रश्नांची आयडिअल दीर्घ उत्तरं छापून द्यावीत असं ठरवलं. मला ही उत्तरं लिहून काढायला सांगितली; ती तपासली; सुधारली; दोन रिविजन्स केल्या. मग वसंत चौधरी काकांच्या छापखान्यात ती छापायला दिली. कागद कोणता, खिळ्यांचा साइज कोणता, सारं सरांनी ठरवलं! ‘उद्या संध्याकाळी ‘प्रुफं’ घेऊन जा! – चौधरी काका म्हणाले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ‘प्रुफं’चा सुंदर नीळ्या प्रिंटचे सहा कागद घेऊन आनंदाने मी सरांकडे गेलो. सरांनी लाल-निळी पेन्सील हातात घेऊन एकेक शब्द तपासला, विरामचिन्हं, काना-मात्र-वेलांट्या तपासल्या, प्रत्येक चुकीला वरितुळ केलं! सत्तावीस चुका होत्या. सर चुकचुकले! मान नापंसंतीने हलवली. म्हणाले- ‘हे लोक म्हणजे नीट वाचत नाहीत!’ मग पुन्हा छापखान्यात फेरी! अशा चुका कमी करत तीन फेऱ्या झाल्या! तिसऱ्या वेळी प्रिंटर काका म्हणाले, ‘जा, तुझ्या मास्तरला सांग! तीस वर्ष एसएससी चे पेपर छापून देतेय. त्यांचं पण इतक्या वेळंस चेक कराया लागत न्हाय! जा!’ सरांना मी हा निरोप देऊ शकलो नाही! परंतु ह्या अनुभवांतून सरांचा परफेक्शनचा ध्यास मला समजला. त्यातून जेवढं काही शिकता आलं, ते मी शिकलो; प्रामाणिकपणे पाळण्याचा प्रयत्न केला! कधी ओरडा मिळाला; कधी कामाला उशीर झाला; कष्ट पडले; ‘त्यात काय एवढं! चालतं!’ हे ऐकलं. पण प्रत्येक वेळी मला सरांची लाल-निळी, सुंदर टोक काढलेली, प्रुफच्या सहा कागदांवरच्या एकेका शब्दावरून पेन्सील आठवली! चुकांभवताली नीट काढलेली तू लाल वर्तुळं आठवली, समासात नीट, सुस्पष्ट लिहिलेले करेक्शन आठवलं, हे सारं करताना रात्री पुढेपुढे सरकलेले घड्याळाचे काटे आठवले, काम मनासारखं पूर्ण झाल्यावर समाधानाने स्मित करणारा सरांचा चेहरा आठवला! मी स्वतःलाच बजावलं! तुझं प्रत्येक काम सर वरून पहाताहेत! तेव्हा पूर्णत्वाचा ध्यास ठेव! 
 
॥॥ …. तस्मै श्री गुरवे नमः॥

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top