Parulekar Sir Foundation

परुळेकर सर २० जुलै जन्मतिथी – १६ डिसेंबर पुण्यतिथी

पूर्णत्वाचा ध्यास
 
कोणत्याही कामात पूर्णत्वाचा ध्यास घेणं हे परुळेकर सरांचं वैशिष्ठ्य होतं. मग ते काम कितीही साधं असो. अशा पूर्णत्वासाठी, perfection साठी ते कायम सजग असायचे; स्वतः परफेक्ट असतंच, पण इतरांकडूनही ते परफेक्शनची मागणी करायचे! 
 
सरांचं किंचित उजवीकडून डावीकडे झुकलेलं नेटकं अक्षर कित्येक जणांना आठवत असेल. फळ्यावर उत्तरं लिहायला ते ज्याला किंवा जिला सांगत, त्याचं किंवा तिचं अक्षर मोत्याच्या दाण्यागत असे! हस्ताक्षरातला नीटनेटकेपणा त्यांना प्रसन्न करायचा. माझा एक वसईकर विद्यार्थी अतिशय देखण्या हस्ताक्षरात, उत्तरात व्याकरणाच्या अक्षम्य चुका करायचा आणि त्या सुंदर हस्ताक्षराच्या प्रभावाखाली त्या चुका कशा बेमालूम खपून जायच्या, हा विनोदाचा भाग म्हणून आठवतो!
 
उत्तरपत्रिका बनवायला सरांकडे जुन्या उत्तरपत्रिकांमधून न वापरलेल्या कोऱ्या पानांचा गठ्ठा जमा केलेला असायचा. त्यातून नेमकी, एका आकाराची आठ नाहीतर बारा पानं काढून, ती नेमकी शिवून नवीन उत्तरपत्रिका बनवून सरांनी तयार ठेवलेली असे. हातात पडल्यावर सोडवायला हुरूप येई. अशा पानांवर डावीकडे बरोबर एक इंच सोडून समास हलक्या हातांनी आखायचा; उजवीकडे पाव इंचापेक्षा जरा कमी समास आखण्याची पद्धत सरांकडेच शिकलो. उत्तर लिहितांना अक्षर नीट ओळीवर यावीत, अक्षरांतलं, दोन शब्दांतलं अंतर सुयोग्य तेवढं आणि तेवढंच यावं असा सरांचा आग्रह असे. कधी मराठी लेखनात मध्येच इंग्रजी शब्द आला तर ओळीच्या वर गिचमिड न करता कसा लिहावा हे सरांकडूनच शिकावं! अक्षर नीट यावं आणि पाठांतरही नीट व्हावं यासाठी सर तेव्हा मुलांना मे शाळेच्या मे महिन्याच्या सुट्टीत महत्वाचे धडे लिहून काढायला सांगत असत. बाजूला बसलेल्या मुलांना लेखन नीट पूर्ण झालं की नाही हे तपासायची जबाबदारी असे. ‘सरांना लेखनाची वही पूर्ण पाहिजे’ ह्या प्रेशरखाली काही आळशी मुलं क्लास सुरू असतानाच खाली मान घालून वहीत पटापट धडे लिहीत असत ज्यामुळे अक्षर आहे त्याहून अधिक वाईट होई; किंवा एकमेकाला मदत करून ‘कंप्लिट झालं, सर’ असंही सांगत. मी क्लासमध्ये उशीरा म्हणजे अॅागस्ट महिन्यात गेलो, त्यामुळे माझ्यावर ‘वही लिहिण्याचं काम’ कधी आलं नाही! सरांच्या ह्या हस्ताक्षर प्रेमासाठी आपण त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हस्ताक्षर स्पर्धा सुरू केली आहे. त्यात बक्षिस मिळवणाऱ्या मुलामुलींची मोत्यासारखी अक्षरं पाहून सर किती प्रसन्न झाले असते नाही?
 
आमच्या एस एस सीच्या वर्षी सरांनी मराठीच्या पन्नास एक प्रश्नांची आयडिअल दीर्घ उत्तरं छापून द्यावीत असं ठरवलं. मला ही उत्तरं लिहून काढायला सांगितली; ती तपासली; सुधारली; दोन रिविजन्स केल्या. मग वसंत चौधरी काकांच्या छापखान्यात ती छापायला दिली. कागद कोणता, खिळ्यांचा साइज कोणता, सारं सरांनी ठरवलं! ‘उद्या संध्याकाळी ‘प्रुफं’ घेऊन जा! – चौधरी काका म्हणाले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ‘प्रुफं’चा सुंदर नीळ्या प्रिंटचे सहा कागद घेऊन आनंदाने मी सरांकडे गेलो. सरांनी लाल-निळी पेन्सील हातात घेऊन एकेक शब्द तपासला, विरामचिन्हं, काना-मात्र-वेलांट्या तपासल्या, प्रत्येक चुकीला वरितुळ केलं! सत्तावीस चुका होत्या. सर चुकचुकले! मान नापंसंतीने हलवली. म्हणाले- ‘हे लोक म्हणजे नीट वाचत नाहीत!’ मग पुन्हा छापखान्यात फेरी! अशा चुका कमी करत तीन फेऱ्या झाल्या! तिसऱ्या वेळी प्रिंटर काका म्हणाले, ‘जा, तुझ्या मास्तरला सांग! तीस वर्ष एसएससी चे पेपर छापून देतेय. त्यांचं पण इतक्या वेळंस चेक कराया लागत न्हाय! जा!’ सरांना मी हा निरोप देऊ शकलो नाही! परंतु ह्या अनुभवांतून सरांचा परफेक्शनचा ध्यास मला समजला. त्यातून जेवढं काही शिकता आलं, ते मी शिकलो; प्रामाणिकपणे पाळण्याचा प्रयत्न केला! कधी ओरडा मिळाला; कधी कामाला उशीर झाला; कष्ट पडले; ‘त्यात काय एवढं! चालतं!’ हे ऐकलं. पण प्रत्येक वेळी मला सरांची लाल-निळी, सुंदर टोक काढलेली, प्रुफच्या सहा कागदांवरच्या एकेका शब्दावरून पेन्सील आठवली! चुकांभवताली नीट काढलेली तू लाल वर्तुळं आठवली, समासात नीट, सुस्पष्ट लिहिलेले करेक्शन आठवलं, हे सारं करताना रात्री पुढेपुढे सरकलेले घड्याळाचे काटे आठवले, काम मनासारखं पूर्ण झाल्यावर समाधानाने स्मित करणारा सरांचा चेहरा आठवला! मी स्वतःलाच बजावलं! तुझं प्रत्येक काम सर वरून पहाताहेत! तेव्हा पूर्णत्वाचा ध्यास ठेव! 
 
॥॥ …. तस्मै श्री गुरवे नमः॥

3 thoughts on “परुळेकर सर २० जुलै जन्मतिथी – १६ डिसेंबर पुण्यतिथी”

  1. Sadguru Kulkarni

    तुम्हाला आलेला सरांच्या पूर्णतेच्या ध्यासाचा अनुभव गुरुबंधू-भगिनींशी शेअर करायचा असेल, तर वेबसाइटवर पोस्ट करण्यासाठी मला पाठवा (WA no 9702010471 or Parulekarsirfoundation@gmail.com) किंवा वेबसाइटवर Comments सेक्शन द्वारे पाठवा. आम्ही तो तुमच्या नावे नक्की पोस्ट करू!
    -सद् गुरु कुळकर्णी

  2. लॅारेन्स पी. घेन्सालवीस

    परुळेकर सर, तुमच्या दूरदृष्टीला आणि मार्गदर्शनाला सलाम! सद्गुरू कुलकर्णींसारख्या विद्यार्थ्याला लिखाण करायला लावून, ज्युनियर विद्यार्थ्यांना शिकवायला लावून तुम्ही जे घडवलेत, ते खऱ्या अर्थाने गुरुकुलात शिकवण्यासारखेच होते. सदगुरू SSC बोर्तुडात चमकला हे त्याचं फळ .आपल्या प्रामाणिक हेतूमुळेच आज सद्गुरू आपल्या PSEF विद्यार्थी ग्रूपला अनमोल मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे हे योगदान तुमच्याच मेहनतीचे आणि शिकवणीचे फळ आहे.
    या सर्व योगदानाबद्दल आणि सद्गुरू कुलकर्णी यांना घडवल्याबद्दल तुमच्याप्रती मनस्वी कृतज्ञता! आणि सद्गुरू कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाबद्दलही आम्ही त्यांचे आभारी आहोत. खऱ्या अर्थाने, “सद्गुरू तस्मै नमः!”
    लॅारेन्स /LPG

  3. आदरणीय सर,
    आपले मार्गदर्शन, आपली शिकवण अजूनही मला प्रेरणादायी आहे. तुमच्यामुळेच मी योग्य मार्गावर वाटचाल करू शकत आलो आहे. आपणाकडून मिळालेले ज्ञान आणि संस्कार नेहमीच माझ्यासोबत राहतील. जीवनाच्या प्रत्येक समस्येत जर कोणी मार्ग दाखवला असेल तर ते आपण आहात सर! आपण माझ्या आयुष्यात गुरु म्हणून आल्याने मी धन्य झालो. शिकवता शिकवता आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य आपण मला मिळवून दिलात . ज्या ज्या वेळी आपली शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडली ती ती वेळ मी अजूनही विसरलो नाही.
    आपण मला अक्षर अक्षर शिकवलात, शब्द शब्दांचा अर्थ उलगडून सांगितलात, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तयार केलात. आपण ज्ञानाचा आणि संस्कारांचा महासागर होतात. एका शेतकऱ्याप्रमाणे माझ्या मेंदूत ज्ञानाचे आणि संस्काराचे बीज आपण पेरून गेलात. त्याचच फळ म्हणून आपला संस्कार वर्ग आपण 1991 थांबविल्यानंतर 2025 पर्यंत पुढे 34 वर्षे मी गुरुकृपा विद्यानिकेतनाचे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करू शकलो. आपणामुळेच माझ्यासारख्या दगडाचा मोती बनू शकला. धर्म, जात, रंग, रूप हा भेदभाव न करता आपण केलेले ज्ञान आजही आम्हा सर्व गुरुबंधू गुरु भगिनींना मनापासून आठवते. एक मित्र, एक मार्गदर्शक, वेळप्रसंगी माझा जवळचा नातेवाईक म्हणून आपण माझ्या जीवनात अवतरलात. ज्ञानाचा हात डोक्यावर ठेवलात, संस्कारांचे बीज मेंदूत रुजवलात, त्याबद्दल मी आपला आजन्म कृतज्ञ आहे. सामान्य शिक्षकांनी फक्त मला सांगितले, वरिष्ठ शिक्षकांनी स्पष्टीकरण दिले, पण आपण मला प्रेरित केलात. ज्ञानाशी मला जोडणारा सेतू आपण होतात. सर माझे जग संपूर्ण बदलण्यासाठी खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद.
    मला वाटते मी तुमचा शतजन्म आभारी राहीन हे सांगण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे, कारण आज आपला 105 वा अवतार दिन आहे. 🪷🙏🏻👏💐👍🔔🕉️मला एक जबाबदार व्यक्ती बनवण्याबद्दल मी आपला ऋणी आहे. उद्याची आव्हाने पेलताना आपल्या शेवटचा श्वासापर्यंत आपण माझ्याबरोबर राहिलात हे माझे मी नशीब समजतो. आपण मला हिऱ्याप्रमाणे सजवण्यासाठी आपल्या पहिल्या भेटीतच मला विद्यार्थ्यांना शिकवण्याची गळ घातली. त्यामुळे मी माझ्या एसएससी पासून आजमितिपर्यंत ज्ञानदान करत आलो. स्टेट बँकेसारख्या अग्रगण्य बँकेत मजबूत पगार मिळत असूनही मी सर्व व्यसनांपासून दूर राहू शकलो ही सर्व आपली माझ्या बाबतीतली भविष्याची विचारसरणी माझ्या आयुष्याला फुलून गेली. माझ्या शिकवणी वर्गाला विद्यानिकेतन हे आपण सुचवलेले शीर्षक आपला माझ्यावरचा विश्वास आणि आपुलकी दाखवून गेला. माझ्या गुरुकृपा विद्यानिकेतनाच्या सर्व कार्यक्रमांना आपली उपस्थिती हाच मला मिळालेला आशीर्वाद होता. गुरुकृपा विद्यानिकेतनाच्या वास्तूमध्ये आपली वेळोवेळची उपस्थिती मला नेहमीच उपकारक ठरली.आज पर्यंत समाजात माझी जी काही प्रतिमा उभी आहे त्याचं सर्व श्रेय सर आपणाला आहे. आज आपणास आपल्या जन्मदिनासाठी मी पामर, मनापासून शुभेच्छा अर्पण करतो.
    आपला वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सोनपिवळ्या उन्हा मधल्या रिमझिमणाऱ्या श्रावण धारा.
    एकूणच आपण मला केलेल्या मार्गदर्शनामध्ये मला शिवनेरीची श्रीमंती, पुरंदरची भव्यता, सिंहगडाची शौर्यता, सह्याद्रीची उंची आढळली.
    माझ्यासारख्या इतर गुरुबंधू भगिनींसाठी तितकेच परिश्रम घेऊन त्यांच्या जीवनाची नौका पैलतिराला सुखरूप नेताना आपण नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहिलात. आपल्या शिकवणीतून आणि संस्कारातून थोडफार स्वीकारल्याने आज माझे जीवन वयाच्या 72 व्या वर्षी सुद्धा मला आनंद देऊन जात आहे.
    सर आपणास शतशत नमस्कार.
    पुन्हा एकदा आपल्या जन्मदिना बद्दल शुभेच्छा व्यक्त करताना मी आपला ऋणी राहत आहे.
    दीपक नाईक
    9922017555

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top