Parulekar Sir Foundation

सरांची सहनशीलता

परुळेकर सरांच्या सहनशीलतेची एक अविस्मरणीय आठवण. आज परुळेकर सरांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांची आठवण माझ्या मनात ताजी झाली आणि त्यांच्या अथांग सहनशीलतेचा एक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करावासा वाटतो. नेहमीप्रमाणे मी त्यांना भेटायला रोशन अपार्टमेंट, पापडी इथे दुपारी साधारण चारच्या सुमारास गेलो. सर आरामखुर्चीवर शांत बसले होते. मला पाहताच त्यांनी हळूच बाईंना सांगितले, “अगं, लॉरेन्स आला आहे ग.” (पु लं चे चितळे मास्तर असते तर कदाचित म्हणाले असते, “गो तुझं वानर आलंय, खरवस की काय तो तयार ठेव चहासोबत!” हा विनोद असो.)

आम्ही चहा घेत असताना मला जाणवलं की सर नेहमीसारखे बोलत नव्हते. एखादा दुसरा गरजेपुरता शब्द ते उच्चारत होते. मी निरखून पाहिलं तर त्यांच्या डोळ्यातून नकळत अश्रू ओघळत होते. “काहीतरी गंभीर आहे,” हे मी मनोमन ओळखलं. हळूच उठून स्वयंपाकघरात जाऊन मी बाईंकडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी सरांची दाढ खूप दुखत असल्याचं सांगितलं. मी काहीच न समजल्यासारखं दाखवून पुन्हा सरांजवळ येऊन बसलो. तासाभराने सर उठले आणि हातात रुमाल घेऊन म्हणाले, “चल निघूया.” आणि आम्ही नेहमीप्रमाणे इव्हिनिंग वॉकसाठी बाहेर पडलो. किती ही सहनशीलता! स्वतःचं दुःख दुसऱ्यापासून लपवण्याचं कसब, आणि दैनंदिन व्यवहार वेळेवर पूर्ण करण्याची शिस्त! हा प्रसंग त्यांच्या सद्गुणांची साक्ष देतो.

परुळेकर सर केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते सहनशीलता, कर्तव्यनिष्ठा आणि आत्मनियंत्रणाचं मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या या गुणांना आज त्यांच्या वाढदिवशी विनम्र अभिवादन.💐💐

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top